सिल्लोड (प्रतिनिधी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त राज्यात आयोजित केलेल्या गोदा ते नर्मदा यात्रेच्या पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पूर्णा व वाघुर या नद्यांच्या पवित्र जलाचे पूजन करून जलकलश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले.
सिल्लोड येथील आमदार अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय, शिवसेना भवन येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, जि. प. सदस्य देविदास पालोदकर कृउबा समितीचे संचालक सतीश ताठे, पं. स. चे माजी उपसभापती अजित सेठ बागवान, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, अजिंठा सरपंच नजीर अहमद, सोनसिंग चव्हाण, जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता अभय शेळके, शाखा अभियंता प्रीतम राठोड, शिवाजी बुचाले आदींची उपस्थिती होती.
गोदा ते नर्मदा ही यात्रा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली असून, राज्यातील विविध पवित्र नद्यांचे जल एकत्रित करून ते नर्मदा नदीत अर्पण करण्याचा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे.
यात्रेची सुरुवात त्र्यंबकेश्वर आणि चौंडी येथून दोन स्वतंत्र शाखांमधून होणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीच्या उगमस्थानापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यात्रेचे उद्घाटन होणार आहे.
ही शाखा संगमनेर मार्गे शिर्डी येथे दाखल होईल. दुसरीकडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी येथून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते यात्रेची दुसरी शाखा प्रारंभ होऊन अहिल्यानगर मार्गे शिर्डी येथे येणार आहे.
त्यानंतर दोन्ही शाखा एकत्रित होत छत्रपती संभाजीनगर, धुळे मार्गे मध्यप्रदेशातील माहेश्वर येथे नर्मदा नदीकाठी पोहोचतील. तेथे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते यात्रेचे स्वागत या करण्यात येणार आहे.
यात्रेच्या अनुषंगाने राज्यभरातून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू होत असलेल्या ङ्गङ्गगोदा ते नर्मदाफ्फ़ ही यात्रा राज्यातील सांस्कृतिक व धार्मिक ऐक्याचे प्रतीक ठरणार असून, विविध नद्यांच्या संगमातून पर्यावरण संवर्धन व जलसंवर्धनाचा संदेश देणारी ठरणार असल्याचे प्रतिपादन यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
विविध नद्यांचे जल स्थानिक नागरिकांच्या हस्ते जलकलशात संकलित केले जात असून, त्याचे धार्मिक विधीनुसार पूजन करून ते पुढे नर्मदा नदीत अर्पण केले जाणार आहे. सिल्लोड मतदारसंघातील पूर्णा व वाघुर या नद्यांचे जलही यासाठी निवडण्यात आले असून, आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते त्याचे पूजन करण्यात आले.














